टीम महाराष्ट्र देशा : कोरोना व्हायरसमुळे गेल्या महिन्यापासून राज्यासह देशात लॉक डाऊन आहे. यामुळे अनेक उद्योग धंद्यासह शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालये हि बंद ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये असे आवाहन केले असतांनाच राज्य सरकारने देखील कर्मचारी व शिक्षकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार असेल तरी एप्रिल महिन्याचे वेतन नेहमीप्रमाणे एकाच टप्प्यात देण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांनाही एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार एकाच टप्प्यात मिळणार आहे, असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
दरम्यान, मार्चमधील पहिल्या टप्प्यातील वेतन देण्यासाठी सुचना दिल्या असून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील वेतनाचे आदेश देखील मिळतील. हि माहिती राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
सध्या, राज्यात लॉक डाऊन चालू होऊन महिना होऊन गेला आहे. तर चालू एप्रिल महिन्यात देखील पूर्ण लॉक डाऊन आहे. सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने त्याचा प्रभाव कर संकलनावर झाला आहे.


