Share

कोरोनाचा स्रोत न सापडणे घातक ! एकाएकी परिस्थिती ढासल्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अमरावती शहरातील विविध चार भागातील चार कुटुंबांमध्ये कोणाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग झाला या स्त्रोताचा अजूनही शोध लागलेला नसल्याने या परिसरात धारावी प्रमाणेच कोरोनाचा आगडोंब उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीची परिस्थिती एकाएकी ढासळली तर या परिस्थितीला पूर्णपणे जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत राहणार असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

काल सायंकाळी अमरावती शहरात आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सगळ्यात गंभीर म्हणजे दोन्ही व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. मृत्यूनंतर इसम पॉझिटिव्ह होता, असे आढळलेली ही तिसरी घटना आहे. कोरोना संसर्ग झालेले चारही परिवार निजामुद्दीन येथे झालेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला गेलेले नव्हते. या चारही परिवारांची प्रवास झाल्याची नोंद नाही. विदेशातून आलेल्या व्यक्तीच्याही संपर्कात ते आलेले नाहीत. वेगवेळ्या वस्तीतील व वेगवेगळ्या चार परिवारातील कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ व्यक्तींना कोरोना चा संसर्ग कोणामुळे झाला, त्या स्त्रोताचा शोध अद्याप लागलेला नाही. याचाच अर्थ असा की अमरावतीमध्ये कोरोनाचा संसर्ग करणारा जिवंत बॉम्ब मोकाटपणे गावात फिरतो आहे. तो अजूनही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीपथास आलेला नाही. याच विषयावरून यापूर्वी आपण स्वतः बारामती प्रमाणे अमरावती मध्ये देखील भिलवाडा पॅटर्न लागू करावा, अशी मागणी वारंवार केलेली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने उद्या अमरावती शहराची हालत खस्ता झाल्यास याला पूर्णपणे जिल्हा प्रशासनच जबाबदार राहणार असल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

पालक मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी कोरोना संसर्ग करणारा स्त्रोत शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनावर दबाव आणणे आवश्यक असताना ते राजकीय पत्रकबाजी करण्यातच दंग आहेत. थ्रोट स्वॅब चाचणीची प्रयोगशाळा आणल्याच्या असंख्य बातम्या आल्या पण प्रत्यक्षात प्रयोगशाळा सुरूच झालेली नाही. प्रयोगशाळा कुठे असावी, यावरून देखील राजकारण सुरू झाले आहे. मशिनरी येऊन पडली तर चाचणी का होत नाही, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. कोरोना चाचणीच्या संदर्भात सामान्य माणसांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. अमरावती शहरात स्वॅब घेण्याचे प्रमाण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. जे काही थ्रोट स्वॅब घेतले गेले, त्याचा निकाल जिल्हा प्रशासनाच्या हाती लवकर येत नाही. थ्रोट स्वॅब घेण्याच्या किटची कमतरता असताना शेकडो किट्स वाया घालवल्याचा गोंधळ फक्त अमरावतीतच उघडकीस आला आहे. प्रयोगशाळेकडे तपासणी साठी घेतलेले नमुने योग्य नव्हते म्हणून शंभरावर नमुने नाकारल्याची नामुष्की जिल्हा आरोग्य प्रशासनावर ओढवली आहे. शंभरावर नमुन्यांचे अहवाल यायला आठ ते दहा दिवस वाट पाहावी लागते. प्रयोगशाळा सुरू होण्याच्या आधी अभिनंदनाचा वर्षाव करून घेण्यापेक्षा ती तात्काळ सुरू करण्याची पावलं का उचलली जात नाही ? हे कोरोनाच्या विरोधातील युद्धात अक्षम्य असल्याची टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

लॉक डाऊन सुरू झाल्यावर पाहिले चार ते पाच दिवस पोलिसांनी कडक व काटेकोर अंमलबजावणी केली होती. मात्र, एकाएकी ढिल देण्यात आली. सध्या शहरात लॉक डाऊनचे तीन तेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत राजकीय स्वार्थासाठी प्रशासनात अडसर आणणाऱ्या महाभागांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात जाऊन त्यांची कोरोना कडे गंभीरपणे पाहण्याची मानसिकता तयार करायला पाहिजे. समाजातील मान्यवरांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत खालपर्यंत सतर्क करण्याची गरज आहे. कारवाई शिथिल करण्यापेक्षा स्रोत व रुग्ण शोधून त्यांना विलग करणे हेच कोणत्याही जनसमूहांच्या हिताचे आहे. कोरोनाचा स्रोत सापडला नाही तर ते तमाम अमरावतीकरांसाठी घातक आहे. यासाठी हॉट स्पॉट असलेल्या भागातील प्रत्येक घराचे आरोग्य परीक्षण होणे गरजेचे आहे. लॉक डाऊन मध्ये ढिल देण्यात येऊ नये. राजरोसपणे वावरत असलेले किंवा दडून बसलेले कोरोना बॉम्ब शोधणे सगळ्यात महत्वाचे आहे. उद्या परिस्थिती ढासळली तर यासाठी शासन व प्रशासन जबाबदार राहील, याची जाणीव ठेवावी, असे देखील शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!