🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. अशातच धुळे शहरातील संजय सोनवणे या एसटी बस वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. याला अनुसरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’धुळे शहरातील संजय सोनवणे या एसटी बस वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त आहे. बडतर्फी, निलंबन, मेस्मा अश्या जीवघेण्या धमक्या देऊन संप मिटवू बघणारे हे निर्दयी, उलट्या काळजाचे खंडणी सरकार अजून किती एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे?’, असा सवालही भातखलकरांनी केला आहे.
धुळे शहरातील संजय सोनवणे या एसटी बस वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे दुर्दैवी वृत्त आहे.
बडतर्फी, निलंबन, मेस्मा अश्या जीवघेण्या धमक्या देऊन संप मिटवू बघणारे हे निर्दयी, उलट्या काळजाचे खंडणी सरकार अजून किती एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे? pic.twitter.com/cH9dPf8w45— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2021
दरम्यान, गुरुवारी संजय सोनवणे यांना विभागीय कार्यालयातून बढतीच्या पडताळणीसाठी हजर राहण्याबाबत फोन करण्यात आला होता. एकीकडे मेस्मा अंतर्गत कारवाईची बातमी आणि दुसरीकडे कार्यालयातून आलेला फोन यामुळे सोनवणे तणावात असून या तणावामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

