मुंबई : मुंबईत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी झोपडपट्टी भागात इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनवर भर देण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुंबईत झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत असल्याने आरोग्यमंत्र्यांनी ही सूचना दिली आहे.
याआधी झोपडपट्टी भागात एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या आसपासच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच क्वॉरन्टाईन करण्याच्या सूचना महापालिका देत होती. मात्र त्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त होती. तसेच लहान घरात लोकांना इतरांपासून लांब राहणं देखील कठीण होतं. त्यामुळे आता अशा लोकांना त्या भागातून बाहेर आणून इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनवर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान,राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पुणे शहरात करोना विषाणूंचे ६४ रुग्ण नव्याने आढळले. तर दिवसभरात ४ रुग्णाचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बळींची संख्या ५६ झाली आहे. आजअखेर पुणे विभागात ७७२ रुग्ण आढळले आहेत. तसेच आज दिवसभरात ३५ रुग्णांची १४ दिवसानंतर घेण्यात आलेल्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आजवर एकूण १२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आज तीन जण करोनाबाधित आढळले असून यांपैकी एका ४० वर्षीय महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेला आहे. ही महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे आज आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे शहरातील एकूण आकडा ६७ वर पोहचला आहे.
यांपैकी ९ रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकूण २० जण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. यांपैकी दोन जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे दापोडी, वाकड आणि मार्केट यार्ड (मृत्यू झालेली महिला) या परिसरातील आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

