मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेले महिनाभर लॉकडाऊन ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक स्थलांतरीत मजूर हे आपल्या गावी परतले. मात्र आता राज्य सरकारने राज्याला आर्थिक चालना देण्यासाठी काही उद्योग सुरु केले आहेत. मात्र कामगार नसल्याने उद्योगांची उत्पादन काढण्याची गती काहीशी मंदावली आहे. त्यामुळे स्थलांतरीत कामगार नसतील तर आपल्या भूमिपुत्रांना नेमा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना केले आहे.
दै. लोकमतच्या एका विशेष कार्यक्रमात बोलतना त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले की, कोरोना संकटामुळे स्थलांतरित मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. त्यामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्थानिक बेरोजगारांसाठी हीच संधी आहे. त्यांनी ही संधी सोडू नये. स्थलांतरित मजुरांच्या जागी गुंतवणूकदारांनी, उद्योजकांनी स्थानिकांना संधी द्यावी.
तसेच उद्योगांना मजूर, कामगार उपलब्ध व्हावेत, यासाठी इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ब्युरो सुरू करत असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. लेबर ब्युरोच्या माध्यमातून कुशल, अकुशल मजुरांची नोंद ठेवली जाईल. या मजुरांना कंपन्यांकडे पाठवण्यात येईल. त्यातून त्यांनी मजूर निवडावेत, असं देसाई म्हणाले. कामगार, उद्योग आणि कौशल्य विकास विभाग मिळून यावर काम करत असून त्यामुळे कामगारांची टंचाई दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता काही भागातील उद्योग व कारखाने सुरु करण्यास राज्य सरकारने परवागी दिली आहे. 65 हजार उद्योगांना आतापर्यंत परवानगी दिली असून त्यापैकी 35 हजार उद्योगांनी उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. त्यात सुमारे 9 लाख कामगार रुजू झाले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
ते म्हणाले की, विदेश गुंतवणूकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी उद्योग विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. अमेरिका, जपान, तैवान, जर्मनी, जपान, इंग्लड आदी देशांच्या प्रतिनिधींसोबत अधिकारी वाटाघाटी करत आहेत.

