सोलापूर : महाआघाडी सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीत असलेला शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार काढून घेत त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनास निर्देश करावेत, अशी मागणी माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाजप सरकारने शेतकऱ्यांनान्याय मिळावा, त्यांच्या हक्काची बाजार समिती असावी म्हणून त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देत शेतकऱ्यांचा सन्मान केला होता. मात्र महाआघाडी सरकारने केवळ विरोध म्हणून हा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय तर झाला आहेत शिवाय त्यांचा अपमानही झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यास शासनास निर्देश करावेत, असे आ. देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी इंडियन चेंबर ऑङ्ग ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष शिवनाथ बोरसे, उपाध्यक्ष भिमराव पाटील, संचालक सचिव अरुण पाटील, खजिनदार प्रदिप कडलक आदी उपस्थित होते .

दरम्याण, तत्कालीन भाजप सरकारने २०१७ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील किमान दहा गुंठे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिला होता. या निर्णयामुळे मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. बाजार समित्यांच्या निवडणुकीचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे कारण पुढे केले गेले. या निवडणुका बाजार फीमधून या केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीतील शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे.


