नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून रखडलेल्या शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहा पदरीकरण कामाची प्रक्रिया तात्काळ सुरू करून ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर काम सुरू करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. काल केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची काल खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील रस्ते विकासाच्या कामांच्या मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले. त्यानंतर गडकरी यांनी शेंद्रे-कागल महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निविदा काढण्याच्या सूचनाही दिल्या.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आणि पुणे ते सातारा या दरम्यानच्या महामार्गाच्या रखडलेल्या विविध कामांबाबत भेट घेतली. या भेटीत सातारा जिल्ह्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा असलेल्या रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम कसे होईल. तसेच जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्गाला जोडणारे जिल्ह्यांतर्गत रस्ते मजबूत करून पायाभूत सुविधा वाढवण्यावर आपला भर आहे. त्यासाठी केंद्राच्या माध्यमातून आवश्यक तो निधी मिळवण्याबाबत भोसले यांची गडकरी यांच्याशी चर्चा झाली.
दरम्यान शेंद्रे ते कागल महामार्गावर कराड शहरातील वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाण पूल उभारण्याची मागणी यावेळी केली. या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे गडकरी यांनी सांगितले. पुणे ते शेंद्रे राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच खंडाळा बोगद्याच्या कामाबाबत चर्चा केली.
याशिवाय कराड ग्रामीण भागातून शहराच्या दिशेने येणारे रस्ते कराड शहराभोवती रिंग रोडच्या माध्यमांतून जोडण्याचा प्रस्ताव असून हा रस्ता तासवडे-शहापूर-अंतवडी-कार्वे-वडगाव-हवेली-कोडोली-पाचवड फाटा असा आहे. यामुळे कराड शहराच्या पूर्व भागाला जोडणार हा रिंगरोड असेल. तर साकुर्डी-येणके-येरावळे-विंग-धोडेवाडी फाटा ते पाचवड हा पश्चिम भागाला जोडणारा रिंग रोड असेल. तर पाटण तालुक्यांतील डिचोली कोयनानगर-हेळवाक-मोरगिरी-म्हारूल हवेली-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन या राज्य महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव असून त्याबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाली.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
एक दोन नव्हे तर तब्बल 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार
- ‘पत्रकारांना देशद्रोहाच्या वधस्तंभावर चढविण्याची तयारी सुरू आहे’
- भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी फिट
- “इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं”


