🕒 1 min read
सांगली : अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर सध्या मोठ्या वादात अडकले आहे. इंदुरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होते.
इंदुरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला. पीसीपीएनडीटी च्या सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठवली आहे. इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही पीसीपीएनडीटीच्या सदस्यांनी म्हटलं आहे.
आता या वादात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उडी घेतली आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात सांगितलेल्या ऑड-इव्हनच्या फॉर्मुल्यामुळं त्यांच्यावर त्वरीत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. सांगली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.
अन्य कोणत्याही राज्याला नाही एवढी पुरोगामी संत व समाजसुधारकांची परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आहे. वारकरी सांप्रदायाचे कीर्तन हे तर समाज प्रबोधनाचे मोठे साधन आहे. मात्र इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य हे अशास्त्रीय असल्याचं अविनाश पाटील यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील संत-समाजसुधारकांचा पुरोगामी वारसा पुढे चालविण्याचं काम करते. त्यामुळे आम्ही महाराजांच्या या अशास्त्रीय वक्तव्यांचा धिक्कार करत असल्याचं पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
