जालना : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये, या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासह सावधनतेची बाब म्हणून बदनापूर तालुक्यातील उज्जैनपूरी येथील रोकडोबा महाराज यात्रा आणि सप्ताह रद्द करण्यात येत असल्याचा ठराव ग्रामसभेने बहुमताने मंजूर केला असल्याची माहिती सरपंच कैलास शिंदे यांनी दिली. या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचे विषाणू झपाट्याने पसरत असल्यामुळे राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. उज्जैनपूरी येथील रोकडोबा यात्रा आणि सप्ताहास गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या प्रमाणात भरणारी ही यात्रा यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केला आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ग्रामपंचायतला मिळालेल्या आदेशाचे वाचनही ग्रामसभेत करण्यात आले. तेव्हा यावर्षी श्री. रोकडोबा महाराज यात्रा व सप्ताह रद्द करण्यात येत आहे, याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी आणि ग्रामपंचायतीस सहकार्य करुन कोरोना विषाणूंचा संसर्ग पसरु नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यावी, असेही सरपंच श्री. शिंदे यांनी शेवटी म्हटले आहे.
तातडीने बोलावण्यात आलेल्या या ग्रामसभेस सरपंच कैलास शिंद यांच्यासह चेअरमन जगननाथराव शिंदे, सुदाम जाधव, रखमाजी शिंदे, बाजीराव शिंदे, राजू घुगे, हाशिम टेलर, रामेश्वर वाघ, भगवान घुगे, भिका जाधव, विष्णू शिंदे, बाबुराव शिंदे, सदाशिव शिंदे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती.
भारतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत आहे. सावधनता बाळगणे हाच सध्या तरी एकमेव पर्याय असून गर्दी टाळावी असे आवाहन राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन करीत आहे. त्यामुळे त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच यावर्षी गावातील रोकडोबा यात्रा व सप्ताह रद्द करण्यात येत असल्याचे सरपंच शिंदे यांनी म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

