सोलापूर : हरिद्वार येथे पर्यटनासाठी गेलेल्या ७० भक्तांचा सोलापूरला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी जोरदार पाठपुरावा करत तेथील सरकारशी बोलणी करून भाविकांना सोलापुरात पाठवण्याचे आवाहन केले होते. तेथील सरकारने भाविकांना सोलापुरात जाण्याची परवानगी दिली असून चाचणी झाल्यानंतर त्यांना पाठवण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले आहेत.
हरिद्वार येथे गेल्या दीड महिन्यांपासून सोलापुरातील 70 भाविक अडकून पडले होते. तेथील भाविकांनी सुटकेसाठी अनेकांकडे विनवण्या केल्या होत्या. यासाठी त्यांना आंदोलनही करावे लागले होते. कोरोनामुळे अडकलेल्या या भक्तांनी जिल्हा प्रशासन उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य शासन या सर्वांशी संवाद साधूनही आपल्याला घरी पाठवण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही, असा आरोप केला होता.
शेवटी या प्रकरणी आ. सुभाष देशमुख यांनी लक्ष घातले. त्यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याशी बोलणी केली तसेच उत्तर प्रदेश शासनाशीही त्यांनी बोलणी करून त्या सर्व भाविकांना सोलापुरात पाठवण्याची विनंती केली. अखेर उत्तर प्रदेश सरकारने ती मागणी मान्य केली असून त्यांची कोरोनाची चाचणी झाल्यानंतर त्यांना सोलापुरात सोडण्यात येणार आहे. दरम्यान, आमदार देशमुख यांच्यामुळे सोलापुरात येण्याचा आपला मार्ग मोकळा झाल्याचे कळताच येथील भाविकांनी हरिद्वार येथून थेट आ. सुभाष देशमुख यांना फोन लावून त्यांचे आभार मानले. तसेच सोलापुरात आल्यावर पहिल्यांदा तुम्हाला भेटायला येऊ असे सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
