पंढरपूर – पंढरपूर हे अतीशय पुरातन धार्मिक क्षेत्र आहे पण त्याकडे आता हौशी पर्यटकही आकृष्ट होत आहेत. असे पर्यटक पंढरपुरात आले की, या गावात विट्टल रुक्मिणी मंदिराशिवाय दुसरे पहायला काय आहे, असा प्रश्न करतात. तशी तर कैकाडी महाराजांनी उभी केलेली शिल्पसृष्टी आगळी वेगळी आहेच पण त्या शिवाय काही नाही का ? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर मुंबईच्या ड्रीम फौंडेशनने दिले असून पंढरपूरपासून १२ किलो मीटर अंतरावर ४२ एकर क्षेत्रात अतीशय सुंदर बाग उभी केली आहे.
या बागेने पंढरपूरचे पर्यटन आकर्षण निश्चितच वाढले आहे. मुळात या प्रकल्पाची कल्पना साकार करणारी ड्रीम फौंडेेशन ही संस्था मुंबईत असली तरी ती मुंबईत स्थायिक झालेल्या पंढरपूर तालुक्यातल्या भंडी शेगावच्या अरुण कंडरे या उद्योजकाने स्थापन केली आहे. हे गाव पंढरपूरजवळ असून पालखी मार्गावर आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचा शेवटचा मुक्काम याच गावात असतो.
या पालखी तळापासून अवघे एक किलोमीटर वर दीर्घकाळपासून ४२ एकर गायरान केवळ पडून होते. त्याच्यावर बरीच काटेरी झुडपे माजलेली होती. ड्रीम फौंडेेशनचे अजित कंडरे आणि श्रीधर यलमार यांना या जागेचा काहीतरी चांगला वापर झाला पाहिजे असा विचार आला आणि त्यातून हे ड्रीम गार्डन साकारले.
ही कल्पना सत्यात उतरवायचे ठरवले तेव्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी होते डॉ. राजेन्द्र भोसले. गायरान उठवून असा काही प्रकल्प साकार करायचा असेल तर त्यांची अनुमती घेणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे खास सरकारी दिरंगाई आणि अनास्था यांचा अनुभव तर आलाच नाही कारण असा काही प्रकल्प उभा करण्याबाबत ते आमच्यापेक्षा अधिक उत्सुक दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता परवानगी दिली.
श्रीधर यलमार सांगत होते. तशी अनुमती देताना जिल्हाधिकारी साहेबांनी एक चांगला सल्ला दिला. ‘आज आपण उत्साहात हे उद्यान उभे करू पण पुढे चालून त्याचे जतन कोण करणार असा प्रश्न येईल. तेव्हा या उद्यानात लावल्या जाणाऱ्या झाडांत निम्मी झाडे ही फळांची असावीत म्हणजे त्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात उद्यानाचा सारा कारभार चालू शकेल.’
त्यांचा सल्ला मानून आता या उद्यानात चिकू, जांभळ, पेरू, आंबा अशा अनेक फळांची झाडे लावली आहेत. शिवाय इतर अनेक झाडे लावली असून ४२ एकरात १७ हजार झाडांचे हे आदर्श वनच उभे राहिले आहे. या कामात पंढरपूरचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, वन विभागाचे पंढरपूरचे अधिकारी आहेर साहेब, तसेच अर्चना माने मॅडम, यांनीही मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. म्हणून या उद्यानाला आदर्श स्वरूप आले.
सोलापूरच्या एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ) ने आपल्या सीएसआर (सामाजिक दायित्व) निधीतून या प्रकल्पासाठी मोठी देणगी दिली आहे. हे सगळे दिसत असले तरी अगदी काटेरी झाडांनी भरलेले हे कायम पडीक असलेले रान दुरुस्त करणे हे सोपे काम नव्हते. त्याला अनेकांचे हात लागले आहेत.
भंडी शेगावच्या शाळांतले विद्यार्थी, बचत गटाच्या महिला सदस्या यांनीही वृक्षारोपणात क्षमदानाच्या रूपात योगदान दिले आहे. काटेरी झाडे उपटून काढणे, खड्डे खोदणे, माती खोदून काढून रस्ते तयार करणे अशी अनेक कामे करण्यासाठी अनेकांनी परिश्रम केले असून अनेक जेसीबी मशीन्स वापरल्या आहेत. हे उद्यान वाडी कुरोली रस्त्यापासून सुरू होते. त्याचे दुसरे टोक कासाळ ओढ्यापर्यंत आहे. या ओढयावर पुढे कोल्हापुरी बंधारा आहे.
मुळात या उद्यानाच्या जागेत पाच पाझर तलाव आहेत. ते आता रुंद करून घेतले जाणार असून पाण्याची मोठी उपलब्धता करण्यात आली आहे. त्यात बोटींगचीही सोय होईल. उद्यानाची रचना अतीशय चांगली करण्यात आली असून प्रत्येक १० गुंठ्यावर बाहेर जाण्याचा मार्ग आहे. पर्यटकांना तिथे रहावेसे वाटले किंवा डबे खावेसे वाटले तर त्यांना थांबण्यास झोपड्या बांधून नॅचरल लूक दिला आहे.
झोपडीवजाच पण सर्व सोयींनी युक्त असे सभागृहही आहे. म्हणजे हे एक रिसोर्टच झाले आहे. तिथे आल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा अनुभव येतो. लहान मुलांना खेळायला आवडेल अशी सारी साधने तिथे आहेतच पण नवग्रहांची वृक्षसृष्टी हा एक आगळा वेगळा उपक्रम तिथे राबवलेला आहे. तिथे आता औषधी वनस्पतींचा एक स्वतंत्र विभाग असणार असून त्यांची उभारणी करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत.
असे हे आगळे वेगळे स्वप्न उद्यान लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरेल यात काही शंका नाही. अरुण कंडरे यांची सात एकर जमीन या उद्यानाला लगतच आहे. त्यावर आता कृषि पर्यटन केन्द्र उभारले जाणार आहे.
सुभाषबापूंची प्रेरणा
या उद्यानाच्या उभारणीत लोकमंगलचे प्रणेते आमदार सुभाषबापू देशमुख यांची मोठी प्रेरणा आणि सहकार्य आहेे. बापू पंढरपूरला कोणत्याही कामानिमित्त आले तर त्यांची ड्रीम गार्डनला भेट ठरलेलीच असते. तिथल्या अनेक झाडांत त्यांचा जीव गुंतलेला आहे. कारण ही झाडे त्यांनी चिखलाचा आणि मातीचा विचार न करता आपल्या हाताने लावली आहेत. बापूंचा सोेलापूर जिल्ह्यात वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आहे. त्यातून त्यांनी या उद्यानाला मोठी मदत केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

