🕒 1 min read
औरंगाबाद : महाजनादेश यात्रेच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून यात्रा काढल्या जात आहेत. पण लोकच येत नसल्याने त्यांना या यात्रा मंगल कार्यालयात भरवाव्या लागत आहेत. पंधरा वर्ष राज्यात सत्ता असतांना त्यांना जनतेचा विसर पडला. केवळ माजोरी आणि मुजोरी केल्यामुळेच जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. म्हणून 2014 आणि आता 2019 मध्ये देखील केंद्रात त्यांच्या विरोधी पक्ष नेता नाही. महाराष्ट्रात देखील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल एवढे आमदार निवडूण येणार नाही. हारले तरी सुधरले नाही, जनतेत जात नाही, त्यांची माफी मागत नाहीत असा टोला देखील फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लगावला.
औरंगाबाद येथील महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर करण्यात आले होते. तत्पुर्वी भव्य रोड शो काढण्यात आला. सभेला मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टिका केली.
फडणवीस म्हणाले, राज्यात आणि देशात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था वाईट आहे. त्यांचा विरोधी पक्ष होईल एवढी संख्या देखील त्यांच्याकडे नाही. पण आपल्या अपयशाच खापर ते ईव्हीएमवर फोडत आहेत. हा प्रकार म्हणजे एखाद्या बुद्धू मुलाने अभ्यास न करता परीक्षेला बसणे आणि नापास झाल्यावर वडीलांना पेनच खराब होता असे म्हणण्या सारखे आहे. कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची अवस्था सध्या अशाच नापास झालेल्या मुलासारखी झाली आहे. जो आपल्या पराभवाला ईव्हीएम मशीनला जबाबदार धरतो आहे अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
