मुंबई – राज्यातील वैधानिक विकास मंडळांचा कालावधी आज ३० एप्रिल रोजी संपत असून, ही मुदतवाढ न देण्यात आल्यास मागास भागांची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येईल, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करताना ते म्हणतात की, वैधानिक विकास मंडळांची मुदत आज संपत आहे. सत्तेतील एक पक्षाने सातत्याने याचा विरोध केला आहे. परंतू त्यांच्या दबावात येऊन वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ न दिल्यास मागास भागाची २५ वर्षांची लढाई संपुष्टात येईल. विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील मागास भाग यामुळे विकासापासून वंचित राहील. या वैधानिक विकास मंडळांना तत्काळ मुदतवाढ द्यावी, ही माझी नम्र विनंती.
माजी सैनिकांशी संवाद –
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या संवादसेतूच्या सत्रात माजी सैनिकांशी संवाद साधला. या संवादात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे सुद्धा उपस्थित होते.
माजी सैनिकांनी देशाच्या सेवेसाठी आपल्या आयुष्यातील मौल्यवान काळ दिला आहे आणि आज कोरोनाविरोधातील युद्धात सुद्धा ते त्याच ताकदीने उतरले आहेत, याचा मला अतिशय आनंद होतो. आपण सर्वांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, कोरोनाविरोधातील हे युद्ध काही अजून संपलेले नाही. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर आपल्या सर्वांना अधिक सावध राहून काम करावे लागेल. अधिक ताकदीने आणि शिस्तीने या स्थितीचा मुकाबला करावा लागेल. थोडक्यात काय तर कोरोनासोबतच जीवन जगणे शिकावे लागेल. अधिक संघटितपणे या काळात काम करण्याची सर्व माजी सैनिकांची इच्छा आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
ज्यांनी लष्कराच्या रूग्णालयात काम केले आहे, त्यांना या काळात वैद्यकीय सेवा देण्याची इच्छा आहे, ही सुद्धा अतिशय आनंदाची बाब आहे. लॉकडाऊनची अधिक प्रभावीपणे आणि शिस्तीत अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा ते मोलाची कामगिरी वठवू शकतात. त्यांच्या शिस्तीचे आणि ज्ञानाचे भाजपाच्या सेवाकार्यात मोठे योगदान मिळतेय्, ही आनंदाची बाब आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

