मुंबई : शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे अशी इच्छा अनेक वेळा बोलून दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला गळती लागली. पक्षातील अनेक आमदार व नेते शिंदे गटात सामील झाले. यानंतर शिवसेनेतील काही नेत्यांनी तसेच एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनीही ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे अशी इच्छा बोलून दाखवली होती. यामध्ये दिपाली सय्यद यांनीही वारंवार याबाबत भावना व्यक्त केली होती.
ठाकरे-शिंदे यांना एकत्र करण्यासाठी दिपाली सय्यद यांनी एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत यावे, अशी इच्छा दिपाली सय्यद यांनी व्यक्त केल्याचे समजले आहे. ‘शिंदेसाहेब तुम्ही परत एकदा मातोश्रीवर या उद्धवजींशी बोला सगळं नीट होईल, अशी विनंतीही त्यांनी केले आहे.
दिपाली सय्यद यांच्यासह शिंदे गटातील काही आमदारांनीही अनेक वेळा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र येणे भाजपला मुळीच मान्य नसणार आहे. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून ऐनवेळेस भाजप सोबतची युती तोडण्यात आली होती. त्यामुळे भाजपला त्या निवडणुकांमध्ये जास्त सीट मिळूनही विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यामुळेच भाजपला आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेसोबत जाणे मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केले होते. “द्रौपदी मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणुन उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तश्याच प्रकारचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन मिळावे याकरीता शिंदे यांनी मातेश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी यासाठी आज भेट होईल.”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या :


