टीम महाराष्ट्र देशा : पब्जी, ब्लू व्हेल, गो पोकेमॉन, गेमने अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच आता टिक-टॉकनेही भर पाडली आहे. टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात शिर्डीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बंदुकीतून गोळी सुटल्याने तरुणाचा मृत्यू झाला. प्रतिक वाडेकर ( इयत्ता १० वी ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शिर्डीतील हॉटेल पावनधाममधील रुम क्रमांक १०४ मध्ये हा प्रकार घडला. प्रतिक वाडेकर (रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) हा बाहेरगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. प्रतिक वाडेकर त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर आणि अन्य ५ जणांसह हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेतली. फ्रेश होण्यासाठी ते रूम मध्ये गेले असता, त्यांनी टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यातील एकाच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून ती प्रतिकच्या छातीत लागली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेनंतर चौघेही हॉटेलच्या रुममधून फरार झाले. हॉटेल मालकाने रुममध्ये प्रतिकला जखमी अवस्थेत बघितल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन आरोपींविरुध्द कलम ३०२, ३०७, ३४ सह आर्म अँक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. परंतु अद्यापही एक आरोपी फरार आहे.ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी केली असता टिक-टॉक अॅपवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे.


