🕒 1 min read
पुणे : जगभरात ‘कोरोना’ची दहशत पसरली असून आता भारतात देखील त्याने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात पुण्यात विषाणूचा संसर्ग झाल्याचे काही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे आणि मुंबईत करोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय अवलंबण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र सध्या परीक्षांचा मोसम सुरू असल्याने विद्यार्थी आणि विशेषत: पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.परीक्षा पुढे ढकलण्यात येतील असा अंदाज वर्तविला जात असताना राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार नसल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
वर्षा गायकवाड यांनी टि्वट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ‘राज्यात निश्चितच कोरोनाामुळे भीतीचे वातावरण आहे , पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही. आरोग्य विभागासोबत आज दुपारी बैठकीनंतर , शालेय शिक्षण विभाग, शाळा आणि काॅलेज याबाबत निर्णय घेण्यात येतील,’ असे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
राज्यात निश्चितच कोरोनाामुळे भीतीचे वातावरण आहे , पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही. आरोग्य विभागासोबत आज दुपारी बैठकीनंतर , शालेय शिक्षण विभाग, शाळा आणि काॅलेज याबाबत निर्णय घेण्यात येतील . #Corona #Maharashtra #Schools #Exams
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 11, 2020
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावानं बनावट पत्रक जारी करून कुणीतरी विद्यापीठाच्या अखत्यारीतील महाविद्यालयांना परस्पर सुट्टी जाहीर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना २० ते ३० मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे’ अशा आशयाचा संदेश असलेले निवेदन सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
या प्रकाराची माहिती विद्यापीठ प्रशासनानं तात्काळ याबाबत खुलासा करून अफवेचं खंडन केलं आहे. ‘हा संदेश चुकीचा आहे. संबंधित निवेदन विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले नाही. ते कोणीतरी खोडसाळपणे तयार केले आहे. या प्रकारामुळे समाजात अफवा व घबराट पसरण्याचा धोका आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत विद्यापीठाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करणात येणार आहे, असा इशाराही विद्यापीठ प्रशासनानं दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

