🕒 1 min read
मुंबई :- देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
मात्र तरी देखील कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन स्थितीविषयक तज्ज्ञ डॉ. माईक रायन यांनी भाष्य केलं आहे. तसेच ‘ही साथ पुन्हा डोके वर काढणार नाही याची दक्षता घ्यावी,’ अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
‘कोरोना साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने मागे घ्यावेत. याचप्रमाणे या साथीच्या संशयित रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना लागण झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना नीट उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्व देशांतील आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहायला हवे.’
दरम्यान, चीनमधील वुहानमध्ये गेल्या काही दिवसांत या साथीचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. चीनमधील लोकांनी कोरोनाविरोधात जो अहोरात्र मुकाबला केला त्याचे हे फळ असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.


