पुणे : जगभरामध्ये हैदोस माजवणारा कोरोना व्हायरस भारतामध्ये दाखल झाला होताच परंतु तो कालपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये आढळला नव्हता, परंतु पुण्यामध्ये याचे दोन रुग्ण असल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
कोरोनाचे हे दोन रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकांना आवाहन केलं आहे, ते म्हणाले की, या दोघांवर त्यांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास देखील ठेवू नये.
तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या आणि कॉन्व्हेंट शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मांजरी परिसरातील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल 11 मार्च ते 14 मार्च या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, कात्रज, सिंहगड आणि नांदेड सिटी परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही शाळांच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

