गडचिरोली : जनतेने केलेले सहकार्य, प्रशासनाने आतापर्यंत राबविलेल्या उपाययोजना, दिलेले निर्देश यांची यशस्वी अंमलबजावणी जनतेकडून झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा हा आज ग्रीन झोनमध्ये आहे. यानंतरही जनतेने प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी योग्यरीत्या करुन आपला जिल्हा कायम ग्रीन झोन मध्ये राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आरोग्य विभागाला निधीची कमतरता येवू देणार नाही. आरोग्य विभागाने आवश्यक प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावे. आम्ही प्रस्तावास तातडीने मंजूरी देऊन ते प्रश्न मार्गी लावू. व्हेंटीलेटर, लॅब उभारणी याकरीता आवश्यक मंजूरी तसेच निधी हा आपल्याला तातडीने देण्यात येईल. या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, उप जिल्हाधिकारी कल्पना निळ–ठुबे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 18844 मजूर गेल्या आठवडयात बाहेरुन आलेले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यामधून 4009 व बाहेर राज्यातून 14835 लोक गडचिरोली जिल्ह्यात आलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात फिलिपाईन्स या देशामधून एक स्थानिक व्यक्ती आलेला आहे. त्याला कोणतीही लक्षणे नसली तरी क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातून आज रोजीपर्यंत 2468 लोक बाहेर गेले आहेत. 42199 लोकांना आतापर्यंत होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. आज पर्यंत यातील 19131 लोकांचे होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण होणे बाकी आहे. प्रशासन योग्य ते निर्णय घेत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच आरोग्य विभाग हे जबाबदारीने कार्य करत आहेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जे क्वॉरंटाइन केलेले लोक आहेत त्यातील काही लोक घरी जाण्यासाठी आग्रह करत असून काही लोक प्रतिनिधीसुद्धा घरी जाण्यासाठी आग्रह करत आहेत. त्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी प्रशासनाला दबाव टाकूण घरी जाण्यासाठी आग्रह करु नये. आज गडचिरोली जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. आपल्या सहकार्याची अपेक्षा असून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याला कायम कोरोना मुक्त ठेवू अशी शपथ घेऊन सहकार्य करावे.
जिल्ह्यात व्यापारी प्रतिष्ठाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु याविषयीही तक्रारी प्राप्त होत असून व्यापारी वर्गानी दुकानामध्ये गर्दी होऊ न देता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. सुरक्षित अंतर ठेवून सामानाची खरेदी विक्री करण्यात यावी, याची दक्षता व्यापारी वर्गानी घ्यावी.
जमीन मोजणीची कामे बंद होती. त्यामुळे लोकांना अडचणी निर्माण होत होत्या. आता ग्रीन तसेच ऑरेंज झोन मध्ये जमीन मोजणी बंदी शासनाकडून काढण्यात आली आहे. त्यामुळे शासनाला मोठा महसूलही मिळेल व लोकांची कामेही पूर्ण होण्यास मदत मिळेल असे पालक मंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

