पालघर : पालघरमध्ये दोन साधूंसह तीन जणांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली होती. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली होती. पालघर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास 20 आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पालघर हत्याकांडातील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं समोर आलं आहे.
एका वृत्तानुसार,आतापर्यंत सोबतचे आरोपी आणि इतर अशा 44 जणांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे. तर वाडा, गडचिंचले, डहाणू या भागातील संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सध्या पालघर जिल्ह्यासाठी ही चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे.
दरम्यान,28 एप्रिलला त्याच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आरोपीचा शनिवारी सकाळी प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल सर्जन कांसन वानेरे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचं देखील समजते आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला पालघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वाडा पोलीस कोठडीत त्याला इतर 20 आरोपींच्या समवेत एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच चार दिवसांपूर्वीच त्या कोरोनाबाधित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे अद्याप सुरु आहे.
दरम्यान, पालघर झुंडबळी प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आणखी पाच जणांना अटक केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.या झुंडबळीप्रकरणी आणखी पाच जणांना अटक केल्याने या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता ११५ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला पालघर झुंडबळी प्रकरणाचा तपास सुरू असून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले.


