नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले आहेत. यावर आता काय उपयोजना असाव्यात आणि अर्थव्यवस्थेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काय पर्याय असतील याबाबत आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी अभिजित बॅनर्जी यांनी जनतेच्या हातात थेट पैसा देऊ नका अशी सूचना केली. मोदी सरकार देशवासीयांना दिलासा देण्यासाठी दुसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत आहे. याचपार्श्वभूमीवर अभिजित बॅनर्जी यांनी ही महत्वाची सूचना केली. तर कॉंग्रेस आघाडीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुचवलेल्या योजना या खूप उपयोगी आहेत. त्या केंद्र सरकारने राबवाव्यात, असेही अभिजित बॅनर्जी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, देशातल्या जनतेच्या हाती थेट पैसा दिल्यास समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतील. अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणं योग्य ठरणार नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारनं आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल.
काँग्रेसप्रणीत आघाडी (यूपीए) सरकारच्या योजना अतिशय चांगल्या आहेत, असेही अभिजित बॅनर्जी म्हणाले. तर या योजना केंद्र सरकारने राबवाव्यात असे ते म्हणाले. यूपीए सरकारच्या अनेक योजना चांगल्या होत्या. या सरकारनं त्याच योजनांवर पुढे काम केलं याकडे लक्ष वेधताना त्यांनी आधार कार्डचा संदर्भ दिला. यूपीए सरकारच्या अनेक योजना कोरोना संकटाच्या काळातही उपयोगी ठरू शकतात. मात्र आज त्यांची देशभरात अंमलबजावणी केली जात नाही, असं बॅनर्जी म्हणाले.
येत्या काळात बँकांसमोरील समस्या आणखी वाढतील आणि नोकऱ्या वाचवणंदेखील कठीण होईल, असा मुद्दा राहुल यांनी उपस्थित केला. त्यावर खरंच अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं बॅनर्जी म्हणाले. देशाला आर्थिक पॅकेजची गरज आहे. अमेरिका, जपाननं अशा पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र आपल्याकडे अद्याप अशा प्रकारच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली नाही. लहान उद्योगांना आर्थिक मदतीची गरज आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

