जालना : मुंबई येथील बंदोबस्तावरून परतलेल्या जालना येथील राज्य राखीव दलातील 127 जवानांचे अहवाल प्रयोग शाळेकडून दुसऱ्यांदा निगेटिव्ह प्राप्त झाले असून या अहवालामुळे जालना वासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने मुंबईतील बंदोबस्तात राज्य शासनाने मागील कालावधीत मोठी वाढ केली होती. या बंदोबस्तासाठी जालना येथील राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते. राज्यात कोरोना बाधित सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. अशा जोखिमग्रस्त शहरात बंदोबस्त करून जालना येथे परतलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवळपास 127 जवानांपैकी दहा जवानांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते तर उर्वरित जवानांना जालना येथीलच पोलीस प्रशिक्षण केंद्रात कॉरटाईन करण्यात आले होते.
या सर्व 127 जवानांच्या लाळेचे नमुने मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. सदर सर्व जवानांचे अहवाल यापूर्वी निगेटिव्ह प्राप्त झाले होते. परंतु कोणतीही जोखीम नको म्हणून राज्य राखीव दलाच्या समादेशकानी निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या जवानांचे लाळेचे नमुने पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविण्याची विनंती केल्यानंतर सर्व 127 जवानांचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबत चा अहवाल काल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून सर्व जवानांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या जवानांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जालनेकरांसह इतर जवान व जवानांच्या कुटुंबाना तसेच जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.


