औरंंगाबाद : रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. मुंबईसह हैदराबाद आणि इतर मार्गाकडे जाणाऱ्या रेल्वेला प्रवाशी कमी मिळत आहेत. तर देशाच्या उत्तर भागाकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेस आणि मराठवाडा संपर्क क्रांती या दोन रेल्वेलाच प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही रेल्वेतून परराज्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये सर्व प्रवासी रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे पुन्हा सुरू करण्यात आली. औरंगाबाद मार्गावर सचखंड एक्स्प्रेस सर्वात प्रथम सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद रेल्वे मार्गावर पॅसेंजरवगळता सर्व गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या होत्या. यात चेन्नई-नगरसोल, नरसापूर-नगरसोल, जनशताब्दी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, विजयवाडा-साईनगर शिर्डी, काकीनाडा-साईनगर शिर्डी, नंदीग्राम एक्स्प्रेस, अजंता एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, साईनगर विशेष रेल्वे यासह हैदराबाद जयपूर आणि रामेश्वरम ते ओखा या गाड्यांचा समावेश आहे. शिर्डी देवस्थान कोरोनामुळे बंद करण्यात आले आहे. यामुळे दक्षिण भागातून साई दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. साई दर्शनासाठी असलेल्या सर्व गाड्यांना प्रवासी संख्या खूप कमी आहे. याशिवाय मुंबईतही ‘ब्रेक दि चेन’मुळे लोकल बंद आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम, तपोवन, देवगिरी, राज्यराणी आणि जनशताब्दी एक्सप्रेसला प्रवाशी संख्या तुरळक आहे. येथून औरंगाबाद-हैदराबाद या गाडीला काही प्रमाणात प्रवासी मिळत आहेत. अन्य गाड्यांना प्रवासी संख्या कमी झाली आहे. सध्या रोज दिल्लीकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसला गर्दी वाढली आहे. आठवड्यातून नांदेड ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसलाही गर्दी वाढली आहे. या गाडीतून परराज्यातील नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत.
अनेक गाड्या रद्द होण्याची शक्यता
प्रवासी संख्या कमी झाल्याने मध्य रेल्वेने जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द केली आहे. या निर्णयाप्रमाणे लॉकडाउन वाढल्यास आगामी काही दिवसात मुंबईकडे जाणाऱ्या तसेच लांबपल्याच्या गाड्या रद्द होण्याची शक्यता रेल्वे विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
- कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

