🕒 1 min read
मुंबई :- ‘करोनासारख्या साथरोगाचे दु:ख सर्वानाच आहे. सरकार कोरोनाविरोधात हिमतीने लढत आहे. नवीन साथरोग असल्यामुळे केंद्र सरकारही काहीसे धास्तावले आहे. त्यामुळे टाळेबंदी पुन्हा १५ दिवसांनी वाढवली आहे,’ असं राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.
एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शिंदे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘टाळेबंदी मे महिन्याच्या अखेपर्यंत किंवा त्याही पुढे वाढू शकते. मात्र, तसे झाल्यास लोकांनी खायचे काय, हा प्रश्न निर्माण होईल. लोक खाणार काय, हा प्रश्न निर्माण होईल आणि त्यातून कधी उद्रेक होईल, हे सांगता येणार नाही,’ अशी चिंता शिंदे यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘टाळ्या वाजवून, भांडी वाजवून, दिवे लावून किं वा पुष्पवृष्टी करुन , काही होणार नाही, हा एका व्यक्तीचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न आहे,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.


