रोहन कदम, पुणे :
महात्मा गांधीजींना देशातील सर्वसामान्यांच्या मनात लोकशाही रुजविण्याचं काम करायचं होतं. भारतीय माणूस अजून लोकशाहीसाठी परिपक्व नाही याची जाणीव संविधानाच्या निर्मात्यांनाही होती. आज मतदानाची सुट्टी हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करणारे पाहिले की या महापुरुषांना काय वाटत असेल असा विचार पडतो. कदाचित कॉलेज निवडणुकांमुळे युवामनावर लोकशाहीस पूरक असणारे संस्कार होण्यास मदत होईल. लोकशाही व्यवस्थेचा प्रत्यक्ष हिस्सा होऊन जगायची सवय आमच्या पिढीला होईल म्हणून महाविद्यालयीन निवडणुका झाल्या पाहिजेत हा आमचा अट्टाहास आहे.
महाविद्यालयीन प्रशासनाकडून बऱ्याचदा विविध शुल्कांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून पैसे उकळले जातात, कार्यालयीन कामकाजातील चुकांमुळे, त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागत असतं. ह्या पार्श्वभूमीवर कॉलेज निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांना तक्रार मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळणार आहे. आमच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळेल. एरव्ही टाकाऊ वाटणाऱ्या कौशल्यांचं कॉलेज-निवडणुकांमुळे मूल्य कदाचित वाढेल.
मृतावस्थेत असणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थी संघटना पुनरुज्जीवित होतील. महाविद्यालयीन निवडणुका सुरु झाल्या तर काहीशा प्रमाणात राजकीय पक्षांना सुद्धा फायदा होईलच कारण विद्यार्थी संघटनाचं पालकत्व घेणाऱ्या राजकीय पक्षांनाही यानिममित्ताने मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते मिळतीलआणि भविष्यातील नेते देखील यातूनच घडतील.
पण तरीही प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबविणे, राबविताना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे अशी आव्हानं आता कॉलेज प्रशासन आणि आधीच कामाच्या प्रचंड तणावाखाली असणाऱ्या पोलीस प्रशासनापुढे असणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला समान प्रतिनिधीत्वाची संधी मिळणं ही आता आमची, म्हणजेच विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल. कॉलेज निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांना आवाज मिळेल का याचं ठोस उत्तर देता येणार नाही. अल्पशा प्रमाणात आवाज नक्की मिळेल पण, त्याचबरोबर निवडणुकांमधली कौशल्यं त्यांना आत्मसात करावी लागतील.
कॉलेज निवडणुका व्हायला पाहिजेत यात तीळमात्र शंका नाही. पण त्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नको. कारण राजकीय हस्तक्षेप आला की तिथे राजकीय निवडणुकीचा रंग त्याला लागेल. मग कॉलेज निवडणुकीला वेगळं वळण लागू शकतं. एकमेकांमधला संवाद कमी होउन द्वेष वाढेल. पण ही काळजी घेतली तर या निवडणूकांमधून नक्कीच नवीन, गुणवान नेतृत्व मिळेल.
ह्या निवडणुकांना सामोरे जाताना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मतदानामध्ये गुप्तता पाळली पाहिजे माझं मत आहे. यामध्ये राजकीय निवडणूकांसारखी शो बाजी नसावी आणि प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वालाच प्राधान्य द्यावं.
काही वर्षापूर्वीपर्यंत फारशा विद्यार्थी संघटना नव्हत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टीची विद्यार्थी संघटना यांच्यासारख्या हाताच्या बोटांवर मोजण्यासारख्या संघटना वगळता फारशा संघटना नव्हत्या. पण गेल्या काही वर्षामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाने आपली एक संघटना काढली आहे.
शिवाय इतरही काही छोटय़ा-मोठय़ा संघटना उगवल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, समतावादी छात्रभारती, अखिल भारतीय विद्यार्थी सेना, युवासेना, अशा विविध संघटना उभ्या राहिल्या आहेत. मुळातच अशा संघटनांमध्ये सहभागी होऊन राजकारणाच्या वाटेवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच तशी कमी आहे. त्यातही अशा अनेक संघटना एकाच वेळी उभ्या राहिल्यामुळे त्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या विभागली गेलीय असं दिसतं.
त्यामुळे विद्यार्थ्यांची ताकद आणि संघटनांची शक्तीही विभागली गेल्याचं दिसतं. विद्यार्थी संघटनांच्या महाविद्यालयांवरच्या ताब्यांवरून होणाऱ्या भांडणांना आता विद्यार्थीही कंटाळले आहेत. शिवसेनेने अलीकडेच मोठा गाजावाजा करत स्थापन केलेली युवासेना हे याचं एक उदाहरण म्हणता येईल. पूर्वी विद्यार्थी संघटना आणि पक्षाच्या युवा संघटना (उदा. काँग्रेसची युवक काँग्रेस, भाजपची भारतीय जन युवा मोर्चा इ.) वेगवेगळ्या होत्या. पण आता मात्र पक्षाच्याच थेट विद्यार्थी संघटना सुरू झाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी हिंसा, दहशत या गोष्टींमुळे कॉलेजांमध्ये होणाऱ्या निवडणुका बंद करण्यात आल्या होत्या. आता तब्बल २३ वर्षांनी कॉलेजांमध्ये पुन्हा निवडणुका सुरू करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. कॉलेज निवडणुकांमुळे देशाला नवं, चांगलं नेतृत्व मिळेल ह्यात तीळमात्र शंका नाही. कॉलेज निवडणुका ह्याच देशाच्या राजकीय जीवनाचा पाया ठरू शकते. वारसाहक्काने मिळणारी लोकशाहीतली पद बंद होऊन, ज्या उमेदवारांमध्ये क्षमता आहे त्यांना नक्कीच संधी मिळेल. कॉलेज निवडणुका लढवताना संयमाची खूप गरज आहे. अभ्यास सांभाळून उमेदवारांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत. कॉलेजमध्ये अनेक प्रश्न असतात, ते सोडवायला या नव्या नेतृत्वाने प्राधान्य द्यायला हवं.
आपल्या पदाचा गैरवापर करू नये. तसेच कॉलेज निवडणुका ह्या विद्यार्थ्यांच्याच आहेत, त्यामुळे त्यात राजकीय हस्तक्षेप नसलेला बरा. राजकीय मंडळींनी ह्यात सहभाग घेणं टाळावं. विद्यार्थ्यांनी मात्र निवडणुकांमुळे मिळणाऱ्या ह्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल योगदान एक सुजाण नागरिक म्हणून भविष्यात दिल पाहिजे असे प्रामाणिक मत एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून माझे आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

