🕒 1 min read
मुंबई : राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना काही सूचना केल्या. कोरोनावर मात करण्यासाठी आता सावध आणि जागरूक होऊन मात करावी लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखायचा आहे, अशा सूचना केल्या आहेत. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील काळात लॉकडाऊन शिथिल करतांना कोणत्याही परिस्थिती जिल्ह्या-जिल्ह्यांच्या सीमा सरसकट सुरु करता येणार नाहीत. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक बंधनं पाळली जाण्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखून तो कंटेन्मेंट झोनबाहेर जाऊ देऊ नये. आता मोठ्या प्रमाणात मजुरांचं ये-जा सुरु झाली असून अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार आहे. संसर्ग वाढणार नाही यासाठी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यश मिळालं आहे. मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यादृष्टीने साथीचे रुग्ण कोणते, कोरोनाचे रुग्ण कोणते याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन वैद्यकीय यंत्रणेसह खासगी डॉक्टरांनाही पूर्णपणे तयार ठेवावे लागणार आहे. विविध जिल्ह्यांच्या घेतलेल्या आढावा बैठकांमधून आरोग्याविषयी सुविधांच्या कमतरता जाणवल्या होत्या. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांत सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान आरोग्य आणीबाणी असताना दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणं ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत. ज्या क्षेत्रात व्यवसाय सुरु झाले आहेत त्या भागात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रीन झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली असल्याने या भागात कटाक्षाने काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
