नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
मुंबई येथे आझाद मैदानावर २५ जानेवारी रोजी विविध शेतकरी संघटनांनी व राजकीय पक्षांनी दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. परंतु या आंदोलनामध्ये शिवसेना पक्षातील एकही नेता उपस्थित राहिला नसल्यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या, यामुळेच आता शिवसेना या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या विचारात असल्याचे सांगितले.
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह समोर आला. त्यामुळे मी सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर सिंघू सीमेवर शेतकऱ्यांना भेटण्याचा विचार करत आहे,” असे संजय राऊत यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

