पिंपरी-चिंचवड: गेल्या ४ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशात हाहाकार माजवला आहे. तर, राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच मुंबई, पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाने थैमान घातल्याचे दिसून आले होते. त्यांनतर, मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले असले तरी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढती रुग्णसंख्या हि चिंतेची बाब बनली होती.
काल, एका दिवसात २४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १ हजार १२ (१,०१२) नवे रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन देखील महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनीही ठेवले मोदींच्या पावलावर पाऊल;चीनला दिला तगडा झटका
दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ हजार ११८ वर गेली आहे. आतापर्यंत एकूण १७ हजार ६७३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आयबीएन लोकमतने वृत्त दिले आहे. तर, पिंपरी-चिंचवड सह पुण्यातील साखळी तोडण्यासाठी जुलै महिन्याच्या मध्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनकाळात देखील रुग्णसंख्या वाढत होती, आता मात्र, पुण्यात या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असला तरी लागून असलेल्या या पिंपरी-चिंचवड परिसरात धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.
इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत जिल्हा न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
पुणे शहरात दिवसाला सुमारे २ हजार नवे रुग्ण आढळून येत होते, ती संख्या आता निम्म्याने कमी झाली असून मृत्यूदरात देखील घट झाली आहे. दरम्यान, भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आली होती.
SSR Case: अभिनेत्री रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरु!
तसेच, देशाबाबत एक चिंताजनक बाब समोर आली आहे. दरदिवशी ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

