मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी आता ईडीने देखील चौकशीच्या सत्राला सुरुवात केली आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी पटना पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या बँक अकाउंटमध्ये देखील फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, रिया चक्रवर्ती हीचा याप्रकरणात संशयास्पद हात असल्याच्या तक्रारीवरून तिच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
तर, यानंतर बिहार पोलिसांचे पथक मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्यांनी, सुशांतची मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी केली होती. याप्रकरणी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचे आरोप करण्यात आल्यानंतर याप्रकरणामध्ये नवा वाद सुरु झाला होता. आता, मनी लौंड्रीग प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची १२ वाजल्यापासून ईडी तर्फे चौकशी सुरु करण्यात आली आहे. सुमारे ६ ते ७ तास चौकशी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काल, ईडीने रिया चक्रवर्तीचा सहकारी व सीएची काल ६ ते ७ तास कसून चौकशी केली होती. यावेळी, तिचे बँक स्टेट्मेंट्स, इतर मालमत्ता अशा सर्वच गोष्टींची सखोल माहिती घेण्यात आली होती. यानंतर खुद्द रियाची आज चौकशी केली जात असून दोन फ्लॅट्स, इतर बँक व्यवहार यावर खुलासा करणे अपेक्षित आहे. दरम्यान, सुशांतची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर व्यावहारिक दृष्टिकोन देखील आता तपासला जात आहे.
महावितरणचा प्रताप : एकनाथ खडसेंना पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल
या प्रकरणात बॉलिवूडसह अनेक मोठ्या व्यक्तींची नावे असल्याचे संशयामुळे मुंबई पोलिसांवर दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह भाजपाचे खासदार व नेते सुब्रमण्यम स्वामी, अनेक भाजपा नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तर, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तर, बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. त्याला अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस मान्यता देण्यात आली आहे.

