Share

‘राममंदिराच्या भूमी पूजनामुळे पवारांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे’

Published On: 

मुंबई- अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही समोर आली आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,” असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

पवारांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे. राममंदिराच्या भूमी पूजनामुळे त्यांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे असं म्हणत भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पवार यांच्यावर पलटवार केला आहे. पाहूया नेमकं काय म्हटलं आहे शिवराय कुळकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये.

राममंदिर, कोरोना आणि पवारांची अगतिकता !
श्रीरामजन्मभूमीच्या मंदिर निर्माणाचा शुभ मुहूर्त ठरला. ट्रस्टने भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जगातील सर्व रामभक्तांच्या भावनांना अनुरूप असल्याने देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर जिथे जिथे रामभक्त आहेत, त्यांनी निर्णयाचे स्वागत केले. मात्र राम शब्द येताच कथित सेक्युलर लोकांच्या पोटात गोळा उठतो. तो याहीवेळी उठला. या कंपूच्या वतीने पहिली प्रातिनिधिक प्रतिक्रिया उमटली ती अर्थात शरद पवार यांच्या कडून. श्रीराम मंदिर निर्माणाने कोरोना जाईल का, असा प्रश्न पवारांनी विचारला. तो स्वाभाविक होता. पवारांनी मोदींना टोला हाणला अशा आशयाच्या लगेच बातम्या झळकल्या.

पवारांची कुत्सित भावना ज्या विचारसरणीतून आणि मनोवृत्तीतून जन्माला आली, त्या विचारसरणीला वर्तमान भारतात जनसमर्थन नाही. महाराष्ट्रातही जनतेने पवारांना कौल दिलेला नव्हता. उलट नाकारले होते. सटवाईला भेटला म्हसोबा या न्यायानेच आघाडीने महाराष्ट्र बळकावला. एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, भारतात आजवर राबवलेल्या छद्म धर्मनिरपेक्षतेचा कडेलोट म्हणजेच रामजन्मभूमी मंदिर निर्माण आंदोलन आहे. राममंदिराच्या भूमी पूजनामुळे त्यांना मिरच्या लागणे स्वाभाविकच आहे.

रामंदिर आंदोलनामुळे तुष्टीकरणाचे काँग्रेसी राजकारण भुईसपाट झाले. राष्ट्रीय अस्मिता जागवणारा हा लढा होता. आता तर श्रीरामजन्मभूमी मंदिरावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर लागल्यावर पवारांसारख्या अनुभवी नेत्याने या विषयावर टीका न करणे अपेक्षित आहे. पण पवारांना सध्या महाराष्ट्रातील दारुण व करूण अवस्थेवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी असा उद्योग करावाच लागणार आहे. ऐंशी वर्षांच्या या योद्ध्याची अगतिकता आपण समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रात केलेले पाप झाकण्यासाठी पवार आणि त्यांच्या पठडीतील खास शिष्य रोज असा उद्योग करताहेत. या वयात त्यांना काय काय करावे लागत आहे !

सतत तीन दिवस पवार मुलाखत मुलाखत नावाचा सामना खेळत होते. आता श्रीराममंदिराने कोरोना जाईल का, असा प्रश्न विचारणाऱ्या पवारांनी कोरोना कशामुळे जाईल याचे मार्गदर्शन किमान महाराष्ट्राला तरी करायला हवे. पण मुलाखतीत त्यांनी कोरोनाला हात घातला नाही. बरं असा लुटूपुटूचा सामना खेळल्याने तरी कोरोना जाईल का ? पवारांना याची पूर्ण कल्पना आहे. तरी पण पवारांच्या उत्साहाला तोड नाही. 22 मार्चच्या जनता कर्फ्युपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर कोरोन्टाईन आहेत. ते बाहेर पडत नाहीत म्हणून ऐंशी वर्षांचे पवार त्यांना वारंवार भेटायला जातात.

कोरोनाच्या हेडलाईन्स मध्ये या भेटीची एखादी बातमी बनतेच. ही अगतिकता नाही तर काय ! कोरोना असो की चक्रीवादळ असो पवार लगेच पोहचतात. वयाचा व दुर्धर व्याधींचा विचार न करता. पण मुख्यमंत्री काही घराबाहेर पडत नाहीत. तिकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक गावात जात आहेत. थेट कोविड हॉस्पिटलमध्ये ते पोहचतात. घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी तो आदर्श घ्यायचा तर त्यांचे बोट घेऊन चालणारे बाळ आदित्य डिझास्टर टुरिझम म्हणून फडणवीसांचीच टर उडवायला निघाले. फडणवीसांना फरक पडत नाही. खमका नेता आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी बाळ आदित्यला कोणी बेबी पेंगविन म्हटले तर त्याच्यावर पोलीस कारवाई करून हे मोकळे झाले. आता सांगा, काय करतील पवार ? मुंबईत कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही. औषधांचा काळा बाजार सुरू आहे. प्रेतांची अदलाबदल होते आहे. हे सारे त्यांना झाकावेच लागेल. अगतिक आहेत ते !

आता राहिला प्रश्न कोरोना कशामुळे जाईल ? अद्यापि पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुठलेही ठोस सोल्युशन दिलेले दिसत नाही. जर महाराष्ट्र एक देश असता तर तो जगात कोरोना संख्येत नवव्या स्थानावर राहिला असता. देशाच्या कोरोना दुरवस्थेत महाराष्ट्राचे सर्वाधिक योगदान आहे. मग कशामुळे कोरोना जाईल ? सुमारे सहा दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या पवारांनी किमान महाराष्ट्रात ते दाखवायला हवे होते. पण तसे काही घडले नाही. मग पवारांना भूतकाळातील जाऊ द्या वर्तमानातील काही प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. घराणेशाहीची परंपरा निभवत रोहित पवार यांना घाई घाईत रयत शिक्षण संस्थेचे सदस्यत्व बहाल करून कोरोना जाईल का ?

माओवाद्यांशी थेट संबंध असलेल्या एल्गार परिषदेतील आरोपींना ते कलाकार, साहित्यिक, कवी आहेत असे सांगून क्लिन चिट देण्याच्या युद्धस्तरावरील प्रयत्नांनी कोरोना जाईल का ? पालघर मध्ये दोन भगवेधारी साधू पोलिसांसमक्ष मारले गेले. असंख्य पुरावे उपलब्ध असताना साधू हत्याकांडासाठी केवळ अफवा कारणीभूत असल्याचे सांगून खुनी जमावाला निर्दोष ठरवण्याच्या तुमच्या कथित सेक्युलर प्रयत्नांनी कोरोना जाईल का ?

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या. त्या थांबवायच्या. मग आपल्या पुढाकाराने नेत्यांमध्ये समाधानकारक चर्चा झाल्यावर पुन्हा बदल्या केल्याने कोरोना जाईल का ? कोरोनाग्रस्त राज्यात वैद्यकीय व्यवस्था कोलमडली असताना शासनाच्या तिजोरीतून मंत्र्यांना कोट्यावधी रुपयांच्या अलिशान महागड्या गाड्या घेतल्याने कोरोना जाणार आहे का? मशिदीवर वाजणाऱ्या भोंग्याना विरोध केला म्हणून एका युवतीला होणारा त्रास न थांबवून कोरोना जाईल का ?

देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री होते तेव्हा पवार साहेब आपण शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले होते. त्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी आपणच केली होती. आपल्या रिमोट कंट्रोल मध्ये चालणाऱ्या राज्य सरकारने अजून दिले नाही. शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफीवर पण आपण बोलत नाही. पीक कर्ज मिळवताना राज्यातील शेतकरी नागवला गेला. कापसाच्या खरेदीत मनमानी सुरू आहे. युरिया साठी रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनापेक्षा जास्त मृत्यू शेतकऱ्यांच्या आत्महत्यातून होत आहेत. आता पुन्हा शेतकऱयांनी दूध रस्त्यावर फेकायचे का ? आपल्याला शेतकरी प्रश्नाची सर्वाधिक जाण आहे, असे म्हटले जाते. पण राज्यात सर्वात बिकट शेतकरी प्रश्न आहे. आपण राज्यातील कोरोनावर बोलत नाही. पण कोरोनाच्या कारणांचा वापर करून प्रत्येक समाज घटक संकटात ढकलला आहे. या पार्श्वभूमीवर रोज भाजपाच्या नावाने बोंबा मारल्याने कोरोना जाईल का ?

राज्यातील आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतरविरोधानेच पडेल, असे वारंवार देवेंद्रजी आणि भाजपाने स्पष्ट केले असताना भाजपा आमचे सरकार पाडणार.. पाच वर्षे आमचे सरकार टिकणार… आमच्या सरकारला धोका नाही.. अशी ओरड केल्याने कोरोना जाईल का ? पवारसाहेब, राज्याचा प्रमुख भयग्रस्त अवस्थेत असताना केवळ कोमट पाण्यावर, गाण्याच्या भेंड्या खेळून कोरोना जाईल का ?

आपल्या भूतकाळातील कथित सेक्युलर कार्याची यादी मालेगाव पासून ते हज हाऊस असो की अफजल खानाचा दर्गा असो, फार मोठी आहे. आपले मानस पुत्र दहशतवादी महिलेचे तारणहार असतात. या सर्व विषयांची पुन्हा उजळणी कशाला ! फक्त सध्याच्या महाआघाडी सरकारची चर्चा पुरेशी आहे. आपण या देशाचे कायम भावी पंतप्रधान आहात. सध्या आपल्याला महाराष्ट्रात चुणूक दाखवायची संधी आहे. आपण आपले सर्व कौशल्य व प्रदीर्घ राजकीय अनुभव पणाला लावून किमान महाराष्ट्र कोरोनामुक्त करावा, अशी कळकळीची विनंती आहे.

आणि हो, मंदिर वही आणि भव्य होणार हे सांगणे न लगे ! मंदिराच्या भूमीपूजनाला मोदीजी येणार आणि तो दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला जाणार !
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!