🕒 1 min read
पिंपरी चिंचवड : दिल्लीच्या निजामुद्दीन येथे झालेल्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या पिंपरी चिंचवड येथील १४जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली येथे झालेल्या मरकजमध्ये पुणे परिसरातील ९२ जण सहभागी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे यापैकी ३५ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर आता यामध्ये पिंपरी चिंचवड येथील १४ जणांची भर पडली आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेला मरकज हा देशाची डोकेदुखी ठरला आहे. कारण एकाच ठिकाणी 2000 हजाराहून अनेकजण एकाच ठिकाणी एकत्र आल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्या मरकजमध्ये महाराष्ट्रातीलही काही नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी काही जण पिंपरी चिंचवड परिसरातील देखील होते. त्यामुळे आता महापालिकेने निर्णायक पाऊलं उचलत १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
तसेच ते पुढे म्हणाले की, संशयित करोनाबाधित रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. हे लोक किती जणांच्या संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे. आणखी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. जमातच्या मुख्यालयात 1 ते 15 मार्च दरम्यान ‘तब्लिग-ए-जमात’ हा कार्यक्रम झाला होता. नमाज अदा करत असताना कोरोनाबाधित व्यक्तीमुळे 200 पेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याची शंका आहे. भाविक सहभागी होऊन मूळगावी परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 350 भाविकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत यापैकी 24 जणांची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तब्लिग-ए-जमातमध्ये सहभागी झालेल्या तब्बल 700 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
