🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
भाजपकडून जेष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे,हर्षवर्धन पाटील,रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी विधानपरिषदेच्या जागेसाठी गुडघ्याला बाशिंग बधून बसले आहेत.दरम्यान,भाजपकडून जी अनेक नवे चर्चेत आहेत त्यापैकी एक नाव माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे.
बावनकुळे यांची उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पाठ फिरवली होती याचा मोठा फटका भाजपला बसला होतं. नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असलेले बावनकुळे यांची माजी मंत्री म्हणून प्रशासनावर चांगली पकड होती. आर्थिक पाठबळ असलेला विदर्भाचा महत्वाचा नेता म्हणून बावनकुळे यांची ओळख आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.
दरम्यान,भाजप यावेळी नेमकी कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागले असताना आज अचानक नाथाभाऊ अचानक चर्चेत आले आहे. खडसे यांनी स्वतः आपण विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं बोलून दाखविल्याने आता मोठी रंगत आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
