सोलापूर : आज कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर नर्स आणि पोलिस यांचे मोठे योगदान आहे. याबरोबरच बँकेच्या कर्मचाऱ्यांचेही योगदान विसरता येणार नाही आज हजारो लोक बँकेत पैसे काढण्यासाठी येत आहेत. त्यांना सुरळीत सेवा हे बँक कर्मचारी देत आहेत. इतर लोकांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांचाही विमा करावा, अशी मागणी आपण केंद्राकडे करत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
गुरुवारी कॉन्फरन्सद्वारे आमदार देशमुख यांनी शहर आणि जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अनेक बँक कर्मचाऱ्यांनी पोलिस नर्स आणि डॉक्टर प्रमाणे आम्हालाही विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी केली. यावेळी डीसीसी बँकेचे कर्मचारी अभिनंदन गायकवाड, तुकाराम कोळेकर, मंजिरी अंत्रोळीकर, समर्थ बँकेचे गणेश कुलकर्णी, सुनील रोकडे, कॉसमॉस बँकेचे रोहित राठोड, लोकमंगल बँकेचे दिनकर देशमुख, माढेश्वरी बँकेचे लक्ष्मण शिंदे यांच्यासह अनेकांनी आमदार देशमुख यांच्या समवेत संवाद साधला व आपल्या अडचणी सांगितल्या.
शक्य झाल्यास घरपोच सेवा द्या
सध्या पैसे काढण्यासाठी ग्राहकांची दररोज बँकेत गर्दी होत आहे.त्यावर उपाय म्हणून बँकेने शक्य झाल्यास घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करावा, याशिवाय बँकेने स्वतः मास्क उपलब्ध करून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना द्यावेत, असे यावेळी सुभाष देशमुख यांनी सांगितले. यावेळी त्यांनी घरपोच सेवा देणाऱ्या समर्थ बँकेचे कौतुकही केले.
प्रत्येक बँकेने क्षमतेनुसार एक गाव दत्तक घ्यावे
आगामी काळात प्रत्येक बँकेने आपल्या क्षमतेनुसार सोलापूर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घ्यावे आणि तेथे सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. असे प्रत्येक बँकांनी केल्यास सोलापूर शहर जिल्हा नक्कीच वैभवशाली बनेल, अशी आशा आ. देशमुख यांनी व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

