मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते.
न्युमोनियातून ते बरे होत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना बरे वाटत होते, आणि त्यांनी हलका आहारही घ्यायला सुरुवात केली होती.मात्र बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
दीर्घकाळ त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते.शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.
कौतुकास्पद : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान
माजी मंत्री व २५ वर्ष नगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, गरीब कुटुंबातून आलेले अनिल भैय्या राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत. गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष अहमदनगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते. विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने ते वावरत असत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने अहमदनगर शहर तर पोरके झाले आहे. त्यासोबतच एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारा मित्रही आम्ही गमावला आहे. अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.
अतिरिक्त दूध योजनेतील दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देणार – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

