मुंबई : राज्यात कोरोना वाढत असताना कोणत्याच उपाययोजना करत नसून परिस्थितीला हाताळण्यात राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे, असा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ठाकरे सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.
याचाच धागा पकडत कॉंग्रेस प्रेदशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात,’ असा टोला थोरात यांनी लगावला आहे.
तसेच याबाबत बोलताना पुढे थोरात म्हणतात, ‘किमान या काळात तरी तक्रार करत बसू नका, सरकारला साथ द्या. आधी सुरुवातीला काही झालं असेल पण आता करोनावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात जेवढं काम होत नाही तेवढं आता राज्य सरकार करत आहे,’ असं थोरात म्हणाले.
दरम्यान, ‘केंद्राचं पॅकेज म्हणजे झाडं लावा आधी मग त्यांना फळं येतील आणि त्यानंतर तुम्ही भूक भागवायची,’ अशा तिखट शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

