मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच आजचा दिवस साजरा केला जात आहे. कोरोनाचे सावट यंदा देखील कायम असल्याने नियम पाळून हा सण मुस्लिम बांधवानी साजरा करावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, बकरी ईद निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. ‘ईद-उल-अजहा’ त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया’ असा संदेश मख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे.
‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो, असा संदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला आहे.
शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो, यंदाची बकरी ईद राज्यावरचं कोरोना संकट दूर करणारी ठरो, अशा शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर ‘बकरी ईद’सह सर्व सण पूर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा खरचं पचणी पडणारा आहे का?
- येणाऱ्या निवडणूकीत औरंगाबाद महापालिकेत काँग्रेसचाच ‘महापौर’ विराजमान होईल, काँग्रेस शहराध्यक्षांचा दावा!
- ‘पालकमंत्री बदला, सांगलीला वाचवा’, निलेश राणेंचा जयंत पाटलांविरोधात नारा
- राज ठाकरे यांनी घेतली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट
- विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज २२ जुलैपर्यंत स्थगित


