🕒 1 min read
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किमान आता तरी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. भाजपच्या केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला ५० टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणासाठी तसेच संरक्षण का शक्य नाही? असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देतानाच ५० टक्के आरक्षण मर्यादाही शिथिल करावी, अशी मागणी काल चव्हाण यांनी केली होती. परंतु, ही मागणी संविधानाच्या मुलभूत चौकटीत बसत नसल्याचे विधान फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केले आहे. त्याला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्यासाठी संबंधित जाती-समूह अपवादात्मक व असाधारण मागास, दूरवर व दुर्गम भागात राहणारा आणि मुख्य प्रवाहापासून दूर असावा, अशी अट इंद्रा साहनी निवाड्यात घातली आहे. मराठा समाज मागास असला तरी ही अट पूर्ण करणे मराठा समाजासाठी आव्हानात्मक आहे. संसदेने घटनादुरुस्ती करून इंद्रा साहनी निवाड्यातील आरक्षणाची ही मर्यादा शिथिल केली तर ती ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर अटीही आपोआपच गैरलागू होतील. मराठा समाजाला कायदेशीर पातळीवर शंभर टक्के टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर ही मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे, असेही अशोक चव्हाण यांनी पुढे सांगितले.
‘वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपने आता कोणतेही राजकारण न करता मराठा समाजाला आणि राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. राज्यांना एसईबीसी जाहीर करण्याचे अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आणि काल केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.’ असं देखील चव्हाण म्हणाले.
यासोबतच, ‘आता त्याच फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाणांच्या समंजसपणावर भाष्य करावे, हा मोठा विनोद आहे. भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यात असंतोष निर्माण करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून आरक्षणाचा मार्ग सुकर झाला तर त्याचे पूर्ण श्रेयही त्यांनीच घ्यावे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्यावी,’ असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा; ‘अनलॉक’ बाबत टोपेंची भूमिका
- राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातील समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी अखेर निधी उपलब्ध !
- मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील
- कसोटीत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर पाचव्यांदा बाद; जाणून घ्या आधीचे रेकॉर्ड्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
