🕒 1 min read
मुंबई : संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
मुंबई पोलिस आयुक्तालयात पोलिसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) आणि स्पेशल प्लास्टिक मास्क वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्यातील पोलिस यंत्रणा या काळात आरोग्याचा धोका पत्कारुन 16-16 तास कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. तसेच सरकार नेहमीच तुमच्या पाठीशी असेल, असा विश्वासही देशमुख यांनी पोलिसांना दिला.
पुढे ते म्हणाले की, ‘मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फत पोलिसांच्या सुरक्षेबाबत आधुनिक अशा या आरोग्य सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. ही बाब महत्वपूर्ण आणि अभिनंदनीय आहे. आपण वापरत असलेल्या नेहमीच्या मास्क व्यतिरिक्त या संचातील साधनांचा उपयोग केल्यास त्याचा आरोग्याच्या सुरक्षेसाठी नक्कीच अधिक फायदा होईल’.
दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फत 10 हजार सुरक्षा साधन संचाचे वाटप करण्यात येत आहे. त्याची प्रातिनिधीक सुरुवात गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.

