मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील न्यायालयीन लढाईसाठी रविवारी (ता. १ ) महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यापूर्वी आज (ता. २९ ) महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारच्या विधी, सामान्य प्रशासन व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
ही बैठक झाल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ”सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा मुद्दा टिकला पाहिजे, आरक्षणासाठी पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली या कर्जमाफीसाठी रांगेत उभे राहावे लागत नाही, मोठमोठे रकाने भरावे लागत नाही,अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात,या दृष्टीने देखील मराठा आरक्षणासंदर्भात ही बैठक घेण्यात आली असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
तर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर महाविकास आघाडी सरकारचे सातत्याने लक्ष आहे. मधल्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचे नाकारता येणार नाही. आमचं सरकार आल्यावर या आत्महत्या कशा कमी होतील, तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर देखील सातत्याने लक्ष ठेवावे लागणार आहे आणि त्या आटोक्यात आणण्याचा आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. त्या दृष्टीने मराठा आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्या अनुषंगाने ही पूर्वतयारी सुरु आहे.
तसेच, १७ मार्चला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणाविरोधात काही जणांनी याचिका केलीय त्याच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

