नाशिक : कोरोनाच्या काळात पोलीस यंत्रणा दिवस रात्र काम करत आहे. अनेक पोलिसांना या कोरोनाची लागण देखील झाली आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी अभिनेता अक्षय कुमार याने पुढे येऊन नाशिक पोलिसांना 500 अत्याधुनिक हातातली घड्याळं दिली आहेत. हे घड्याळ पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणार आहे.
अक्षय कुमारने वाटप केलेल्या घड्याळांमध्ये दररोज शरीराचा रक्त दाब, तापमान, किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हे अत्याधुनिक घड्याळ जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हातात असेल तर दिवसभरात हे अधिकारी किती फिरले? त्यांनी कामं केलीत का? याचंही मोजमाप करण्यास मदत मिळेल.
अक्षय कुमारच्या सह दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडूनही नाशिक पोलिसांना 2 हजार 700 घड्याळांचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच याआधीही अक्षय कुमारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला आर्थिक मदत केली होती. तर आता अक्षय कुमार पोलिसांच्या मदतीला धावून आला आहे.
राज्यात शुक्रवारी कोरोनाचे १ हजार ५७६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २९ हजार १०० वर गेलीय. तर शुक्रवारी २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत काल दिवसभरात ९३३ नवे आढळले, तर ३४ जणांचा बळी गेला. त्यामुळे मुंबईतल्या बळींचा एकूण आकडा ६५५ झाला आहे. दरम्यान काल दिवसभरात राज्यात ५०५ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६ हजार ६५४ वर पोहोचला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
