नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे अनेक देश हे आज लॉकडाऊन आहेत. तसेच अंतरराष्ट्रीय विमान वाहतूक देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भारताचे अनेक नागरिक हे आज आखाती देशात अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांची संख्या ही तब्बल १ कोटी एवढी आहे.
या अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी आता भारत सरकारने भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जर गरज वाटली तर युद्धनौका आयएनएस जलाश्व आणि मगर श्रेणीतील दोन युद्धनौकांना आखाती देशांत पाठविले जाऊ शकते. सरकारने या युद्धनौका तयार ठेवण्यास सांगितल्या आहेत. या बोटींमधून १५०० लोकांना एकावेळी आणले जाऊ शकते.
आयएनएस जलाश्व सध्या विशाखापट्टनमहून खूप लांब आहे. तर मगर श्रेणीतील युद्धनौका पश्चिमी समुद्रामध्ये तैनात आहेत. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, युएई आणि ओमानसह अन्य खाडी किनाऱ्यावरील देशांना आखाती देश म्हटले जाते. या ठिकाणी जवळपास १ कोटी भारतीय कामगार राहतात. यामध्ये जास्तीत जास्त लोक तेल कंपन्या आणि बांधकाम क्षेत्रात काम करतात.
दरम्यान एअर इंडियालाही तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. नौदल आणि एअर इंडियाने तातडीने गल्फ देशांमधील अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्यासाठी एक योजना तयार करावी, असे सांगण्यात आले आहे. यावर एअर इंडिया ५०० विमाने आणि नौदल तीन युद्धनौका तयार ठेवणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
