नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना उद्या (१५ फेबृवारी) ‘शिवसेना भवनात’ पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार, खासदार सर्वच उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले.
दरम्यान या पत्रकार परिषदेबाबत शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. यावेळी त्यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली. “अभी टॉस हुआ है, मॅच तो होणे दो”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे तर हात धुवून संजय राऊत यांच्या मागे लागले आहेत. किरीट सोमय्या यांनी पुणे येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये (Pune Jambo Covid Center) भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान उद्याच्या पत्रकार परिषदेत शिवसेना आक्रमक भुमिका घेणार असल्याचे चित्र दिसत आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील. हमने बहुत बरदाश किया है, बरबाद भी हम ही करेंगे”.


