बीड : मुलगा-मुलगी एकसमान असे सांगणारे मुलींचे महत्त्व सांगणारे अनेक उपक्रम शासनातर्फे राबवले जातात. परंतु वंशाला दिवाच पाहिजे हा अट्टहास करणाऱ्यांची कमी नाही. बीडमध्ये या अट्टहासापायी पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. औरंगपूर येथील घटनेने अनेकांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आहे.
महादेव रेड्डे असे क्रूरकर्मा पतीचे नाव आहे. एक मुलगा व एका मुलीनंतर त्याने पत्नीची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. परंतु मुलाच्या अकाली निधनानंतर पत्नी आता पुन्हा गर्भधारणा करू शकणार नाही, म्हणून दुसऱ्या लग्नाचा लकडा त्याने लावला. पत्नीने नकार दिल्यावर आरोपी पतीने पत्नीला रात्रभर बांधून ठेवून लाकडी दांडक्याने अतिशय क्रूरपणे मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. राधा महादेव रेड्डे (३१, रा. इरगाव, ता. गेवराई) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. शनिवारी पहाटे बीड ग्रामीण ठाण्यात पतीविरोधात गुन्हा नोंद करून पती महादेव रेड्डे यास अटक करण्यात आली आहे.
आरोपी पती महादेवने पत्नीचे हातपाय बांधून पहाटेपर्यंत दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर तो घर सोडून निघून गेला. सकाळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पत्नीने शेजाऱ्यांना हाक देऊन बोलावले. यानंतर तिला लगोलग जवळच्या दवाखान्यात नेण्यात येत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली.
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- ‘उस्मानीचे भाषण ऐकले नाही, मुळात एल्गार परिषदेला महत्व देत नाही’
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा


