मुंबई : मराठी बिग बॉंसमधून प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सल्ला दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने 2020 – 21 या शैक्षणिक वर्षात शाळा महाविद्यालय बंद ठेवावी अशी विनंती केली आहे.
पत्रात बिचुकले यांनी म्हंटले आहे की, कोरोनामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतचे आदेश द्या. कोरोनाने जगभरात कहर माजवला आहे. 15 वर्षाखालील मुले ही भारताचं भविष्य आहे. या वयात मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही किंवा कोरोनाची साखळी तुटत नाही, तोपर्यंत यंदाच्या वर्षी सर्व शाळा-कॉलेज बंद करा.

तसेच अनेक राज्यात इयत्ता नववी पर्यंत श्रेणी पद्धतीचा अवलंब करतात. त्यामुळे मुलांना शाळेत बोलवण्यापेक्षा वर्षभर शाळा बंद ठेवा. अन्यथा शाळा सुरु झाल्या तर खेळण्या-बागडण्याच्या नादात मुलं सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीतच. त्यामुळे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढेल, असंही बिचुकलेने म्हटलं आहे.
दरम्यान बिचुकले हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अनेक स्टंंड करत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. तर विधानसभा निवडणूक 2019ला त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तर सत्तासंघर्षाच्या काळात मला सत्तास्थापनेची संधी द्या अशी मागणी, बिचुकले यांनी राज्यपालांना केली होती.


