🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणा-या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ त्यांच्याविरोधात 354 अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मंगळवारी विश्वनाथ महाडेश्वर यांचा उद्दामपणा एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला.
याबाबत दिवसभर समाजमाध्यमावरदेखील महापौरांच्या या कृतीची फित फिरत असून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असल्यामुळे तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी समस्त महिलावर्गामध्ये होत आहे. सांताक्रूझ पूर्व या त्यांच्याच मतदारसंघात पाणी साचल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मायालेकींचा मृत्यू झाला. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर म्हणून त्यांची जबाबदारी असतानाही त्यांनी कुठलीही कृती केली नाही, म्हणून संतापलेल्या महिलांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला.
यावेळी जाब विचारणा-या महिलेलाचं महापौरांनी दमदाटी केली तसेच सर्वांसमोर तिचा हात पिरगळला. महापौर पदावर असलेल्या व्यक्तिला हे शोभत नाही. त्यामुळेच ज्या प्रमाणे एरवी पोलिस आंदोलकांवर किंवा अन्य प्रकारामध्ये सुमोटो दाखल करून कारवाई करतात, तशीच कारवाई कायद्यातील कलम 354 नुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा आणि महाडेश्वर यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
