टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळावं, यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा राजीनामा पक्षानं स्वीकारला असून लवकरच त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येणार आहे. पण त्याचवेळी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तीन कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे कधीकाळी सर्वात मोठे संकटमोचक असणारे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या मुलावर कॉंग्रेसला या गर्तेतून बाहेर काढण्याची जबादारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि के.सी. पाडवी या तिघांची कार्याध्यक्षपदी नेमणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये अडगळीला पडलेला विलासराव देशमुखांचा गट जोमाने कामाला लागण्याची आशा कॉंग्रेस पक्षाला आहे.
दरम्यान, विलासरावांनंतर अमित देशमुख यांच्यावर कॉंग्रेसने अन्याय केल्याचं बोललं जात होत. मात्र आता कॉंग्रेस संकटात असताना पुन्हा एकदा देशमुख नाव राज्याच्या पटलावर जोमाने पुढे येणार का ? हे येणारा विधानसभा निवडणुका झाल्यावरच स्पष्ट होईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

