पुणे : विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून प्रवक्ते आणि जेष्ठ नेते विकास लवांडे यांच्या नावाची चर्चा आहे. यासंदर्भात आम्ही लवांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वतः विधान परिषदेसाठी ते इच्छुक असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता असून गेली 30 वर्षांपासून पुरोगामी धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधिलकी ठेवून ग्रामविकासाची सुरवात करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे.एक शिक्षण संस्था स्थापन करून माझ्या गावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आलो आहे.
आपल्या आजपर्यंतच्या सामाजिक कामांची माहिती देताना ते म्हणाले, युवक क्रांती दल ( युक्रांद ) या सामाजिक चळवळीत मी 14 वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून राज्यभर सक्रिय होतो. 5 वर्षे माझ्या शिंदेवाडी गावचा सरपंच म्हणून यशस्वी काम केलं आहे. विशेष कामगिरी सांगायची झाल्यास गाव दारूमुक्त ,हुंडाबळीमुक्त , तंटामुक्त , हागणदारीमुक्त केले.
तसेच पुणे जिल्ह्यात व राज्यातील दारूबंदी चळवळ , सार्वजनिक पातळीवरील भ्रष्टाचार विरोधी चळवळ , सामान्य शेतकरी हिताचे प्रश्न , डीएड शिक्षकांचे प्रश्न , महिलांचे प्रश्न ,व्यसनमुक्ती चळवळ अशा विविध कामात सतत पुढाकार घेत संघर्ष व चळवळ केली आहे. विविध सामाजिक प्रश्नावरील आंदोलनात सक्रिय राहिलेलो आहे. अनेक यशस्वी आंदोलने झाली.
पुढे बोलताना ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील अनेक गावांच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना प्रशिक्षक म्हणून काम करण्याची यशदा व झेडपी ने संधी दिली ती जबाबदारी यशस्वी पार पाडली.राज्यात ठिकठिकाणी अनेक व्याख्याने दिली आहेत. सर्वप्रकारच्या निवडणुकीत मी कायम सक्रिय राहिलो आहे.2011 ते 2015 मध्ये 4 वर्षे साप्ताहिक समाजसत्ता संपादक म्हणून जबाबदारी अखंडपणे पार पाडली.
25/30 वर्षांचा राजकीय व सामाजिक कामाचा एकंदरीत अनुभव माझ्या जमेला आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, संसदीय लोकशाही व्यवस्थेत संसदीय राजकारण अटळ असते. समाजकारणासाठी राजकारण हा माझा मूळ पिंड आहे म्हणून मला माझ्या समविचारी जवळचा वाटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य वाटला.पूर्ण विचारांती मी 2014 मध्ये मा. अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. माननीय शरदराव पवार साहेबांच्या विचारांवर लहान पनापासूनच श्रद्धा व प्रेम होते व आजही आहे कायम राहील.पक्षात प्रवेश केल्यानंतर सुरवातीला पुणे जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत होतो.पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात मी सक्रिय सहभागी होतो.
मला सुप्रियाताईंनी जिल्ह्यातील निवडक 100 युवती व युवक कार्यकर्त्यांना लोकसंवाद नावाचे पक्षांतर्गत व्यासपीठ निर्माण करुन प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली. ते यशस्वी काम पाहून तशीच जबाबदारी राज्य पातळीवर दिली.राज्यातील निवडक 120 युवक युवती व महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांना 6 महिने लोकसंवाद व्यासपीठाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले. त्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्हा स्तरावर निवडक कार्यकर्त्यांना कार्यकर्ता शिबीरात मी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील अनेकजण आज राज्यात विविध महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
माझे हे काम पाहून मला पक्षाने 2016 ला प्रवक्ता म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात यवतमाळ ते नागपूर 259 किमी काढलेल्या पदयात्रेत मी पूर्णवेळ सहभागी होतो. पक्षाच्या सोशल मीडियातील युवक कार्यकर्त्यांना सतत सल्ला मार्गदर्शन असो की तत्कालिन सत्ताधारी भाजप विरोधी आवाज उठवण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून पूर्णवेळ प्रयत्न केला आहे.
भारतीय संविधानावर पूर्ण निष्ठा असलेले व पक्षाच्या मूलभूत विचारांचे कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी माझी कायम धडपड राहिलेली आहे व कायम राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असताना मागील 4 वर्षे वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवर व सोशल माध्यमांद्वारे मी पक्षाची बाजू सतत ठामपणे व अभ्यासपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
इतक्या वर्षांत माझा विविध सामाजिक संघटना व स्वयंसेवी संस्था ,कार्यकर्त्याशी जवळून संबंध निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्याशिवाय राज्यभर चांगल्या अर्थाने ओळख निर्माण झाली आहे.
पुढे बोलताना लवांडे म्हणाले,मी सुरवातीपासूनच संघर्षमय जीवन जगणारा कार्यकर्ता असून सातत्याने सामाजिक राजकीय चळवळीत सक्रिय आहे. मी प्रतिगामी , धर्मांध,हुकूमशाही ,जातीयवादी विचारांचा कायम तात्विक व सनदशीर विरोध करत आलो आहे आगामी काळात महाराष्ट्र विधान परिषदेत सदस्य म्हणून पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्यास पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शना खाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा आर.आर .पाटील होण्याचा नक्कीच प्रयत्न करील.
पक्ष नेतृत्वाने माझा विचार केला किंवा नाही केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब बनलेले आहे.मी वैचारिक स्पष्टता व बांधिलकी मानणारा सामान्य शेतकरी कुटुंबातील कोणताही राजकीय वारसा नसलेला कार्यकर्ता असून सर्वसामान्यांना माझा आणखी आधार वाटेल असंच वर्तन व काम करण्याचा प्रयत्न राहील. पक्षाला कमीपणा येईल असं वर्तन होणार नाही.यासाठी मला पक्षाने विश्वास व ताकद देऊन पहावी.माझेकडे प्रचंड पैसा किंवा मोठा कौटुंबिक राजकीय वारसा नाही हा माझा दोष नाही. मात्र माझे व्यक्तिगत स्वच्छ चारित्र्य ,लढाऊ वृत्ती , वैचारिक सुस्पष्टता ,सामाजिक काम व जनसंपर्क ,शासन व्यवस्थेची माहिती हेच माझे मुख्य भांडवल आहे.पक्ष नेतृत्व माझा नक्कीच सकारात्मक विचार करतील व राज्यातील तमाम सामान्य कार्यकर्त्यांमध्ये एक चांगला संदेश देतील ही मला नम्र अपेक्षा आहे !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

