🕒 1 min read
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची २५ डिसें.रोजी जयंती होती. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’सुरु केले आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र?, असा सवालही त्यांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले . कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे , स्वातंत्र्यवीर , महात्मा गांधी , पंडित नेहरू , सरदार पटेल , इंदिरा गांधी , डॉ.आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढय़ होत जाईल , पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल . यामुळे देश आणखी बलाढय़ खरंच होईल ? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही’, असेही ते म्हणाले आहेत.
पुढे राऊत म्हणाले आहेत की,’आजही उत्तर प्रदेशात जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसतशा आयकर विभागाच्या धाडींचा जोर वाढू लागला. या धाडींमागे एक राजकीय सुसूत्रता आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मैदानातील एक प्रमुख खेळाडू बहनजी मायावती या स्वतःच तंबूत परतल्या आहेत. याचे रहस्यही सगळे जण जाणून आहेत. यामागे कोण व का? हे उघड आहे. अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी हजारो कोटी रुपये आधीच जमा झाले असतानाही रामाच्या नावावर जनतेकडून पावत्या फाडण्याच्या प्रकारांवरही टीकेची झोड उठली. भाजपच्या श्रीमंतीचे टोक किती उंचावर गेले आहे ते अयोध्येत भाजप परिवारांतील प्रमुख लोकांनी केलेल्या जमीन खरेदीवरून काल दिसले. ही अशी श्रीमंती ओसंडून वाहत असताना विशेष देणगी मोहीम राबविण्याचे प्रयोजन काय? याचेही उत्तर मोदी यांनी देऊन टाकले आहे. ‘देशास सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या व आजन्म देशसेवा करणाऱ्या आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संस्कृतीला या मोहिमेमुळे अधिक बळ मिळेल. तुमच्या मदतीमुळे भाजप व आपला देश आणखी बलाढय़ होईल’, अशी चिंता पंतप्रधान मोदींनी करावी हे आश्चर्यच आहे.
दरम्यान, मागील लॉकडाऊन काळात आर्थिक व्यवस्था ढासळून पडली आहे. मग अशा वातावरणात जनतेकडून पक्षाच्या तिजोरीत पैसे गोळा करून देश बलाढ्य करण्याचे हे कोणते सूत्र आहे? भाजपच्या देणगी मोहिमेचा व राष्ट्रहिताचा, देश बलाढय़ होण्याचा काडीमात्र संबंध नाही. भाजपच्या तिजोरीत बडे उद्योगपती, ठेकेदार, बिल्डर्स, श्रीमंत लोक मोठय़ा प्रमाणात देणग्या देत असतात. सत्ताधारी हे मोठे लाभार्थी ठरतात व इतर पक्षांनाही कमी-जास्त प्रमाणात देणग्यांचा लाभ मिळत असतो. हे खरे असले तरी भाजप सोडून इतरांना देणग्या मिळू नयेत, निवडणुकीत इतर राजकीय पक्षांची आर्थिक नाकेबंदी व्हावी यासाठीही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. इतर राजकीय पक्षांवर आर्थिक निगराणी ठेवली जाते व त्यांचे नाक-तोंड दाबून भाजप स्वतःची श्रीमंती दिवसेंदिवस वाढवीत आहे. कोविड काळात स्थापन झालेल्या खासगी स्वरूपाच्या पी. एम. केअर फंडात हजारो कोटी रुपये गोळा झाले. त्यातील आर्थिक उलाढालींवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजप किंवा पंतप्रधान अद्याप देऊ शकले नाहीत. भाजपच्या तिजोरीची व पी. एम. केअर फंडाची तिजोरी वाढता वाढता वाढतच आहे. त्यात नागरिकांकडून ५ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत देणग्या घेऊन नैतिक मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, यामुळे देश आणखी बलाढ्य खरंच होईल?’, असा सवालही राऊत यांनी लेखाच्या शेवटी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर…’
- भाजप हा देशातील नव्हे तर कदाचित जगातलाही सगळ्यात श्रीमंत पक्ष- संजय राऊत
- ‘विरोधकांच्या हातातील ‘पुंजी’ कुजवून अडचणी याव्यात हाच भाजपचा उदात्त हेतू’
- पवार साहेबांचा वारसा यशस्वीपणे चालवत असल्याचे अजित दादांनी आज सिद्ध केले- रुपाली पाटील
- ‘मी ‘त्या’ खुर्चीत असतो तर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन एवढे दिवस चालले नसते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
