मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणावरून महाविकास आघाडीतच मतभेद झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय झाला. बाजू मांडण्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिकेत शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात बुधवारी राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली. या वेळी पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेत अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
मागासवर्गीयांची पदोन्नती व सरळ सेवेतील प्रतिनिधित्वाची माहिती संकलित करून त्यांचे शासन सेवेतील आरक्षण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालावर देखील आज चर्चा करण्यात आली. यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यघटनेच्या अनुच्छेद १६ (४) (ए) द्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही, असे राज्याचे मत असल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विहित केलेल्या अपुरे प्रतिनिधित्व व प्रशासकीय कार्यक्षमता या दोन निकषांची पूर्तता होत असल्यामुळे राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येईल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रमाणेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती(ब), भटक्या जमाती(क), भटक्या जमाती(ड) व विशेष मागास प्रवर्ग यांचेदेखील पदोन्नतीमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नाही, असे उक्त समितीच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या व्यक्तीची थेट गडकरींकडे तक्रार; कंपनीविरोधात कारवाई
- ‘महाराजांच्या घोड्यावर बसण्याचा ‘गाढव’पणा करणाऱ्यांवर बाबर सेना काय करणार?’, सदाभाऊंचा सवाल
- ‘जरंडेश्वर शुगरचा खरा मालक लपवण्यासाठी पवारांनी डझन कंपन्यांचे लेयर तयार केले’, किरीट सोमय्यांचा दावा
- ‘आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ’,शिवसेनेचा मोदींना टोला
- सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेल,पण वास्तवातील आकड्याचे काय?


