🕒 1 min read
मुंबई : काही महिन्यापासून घट झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ठाकरे बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची सुरुवात करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. अधिकारी महासंघाने यात पुढाकार घेऊन तसेच सर्वांना विश्वासात घेऊन दोन शिफ्ट्समध्ये मंत्रालयातील कार्यालयीन वेळांचे नियोजन कसे करता येईल ते पाहावे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
मंत्रालयात दररोज अभ्यागतांची संख्या मधल्या काळात खूप वाढली आहे हे महासंघाने यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, यावर काही प्रमाणात प्रतिबंध असणे गरजेचे आहे, यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक-दोन दिवसांत बाहेरून येणाऱ्यांच्या प्रवेश निर्बंधांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणेकरून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मद्यधुंद कारचालकाने रिक्षाचालकासह दुचाकीस्वाराला उडवले; औरंगाबादेत रात्री भीषण अपघात
- मराठवाड्यात ६०५, औरंगाबादेत सर्वाधिक २४० रुग्णांची भर; १९७ कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू
- कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; जालन्यात ११७ नव्या रुग्णांची भर
- मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीजबिलात सूट द्यावी; उद्योजक संघटनांची मागणी
- रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
